अनाम वीरा जिथें जाहला तुझा जीवनान्त
स्तंभ तिथें ना कुणी बांधला, पेटली ना वात !
धगधगतां समराच्या ज्वाला या देशाकाशीं
जळावयास्तव संसारातुन उठोनिया जाशी !
मूकपणानें तमीं लोपती संध्येच्या रेषा
मरणामध्यें विलीन होसी, ना भय ना आशा !
जनभक्तीचे तुझ्यावरी नच उधाणले भाव
रियासतीवर नसे नोंदलें कुणी तुझें नांव !
जरी न गातिल भाट डफावर तुझें यशोगान !
सफल जाहलें तुझेंच हें रे तुझेंच बलिदान !
काळोखांतुनि विजयाचा ये पहाटचा तारा
प्रणाम माझा पहिला तुजला मृत्युंजय वीरा !