Categories

देहाची तिजोरी

गीत जगदीश खेबूडकर
संगीत सुधीर फडके
स्वर सुधीर फडके
चित्रपट आम्ही जातो अमुच्या गावा
राग / आधार राग नट, भूप
गीत प्रकार भक्तीगीत, चित्रगीत

 

 

देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा
उघड दार देवा आता, उघड दार देवा

पिते दूध डोळे मिटुनी जात मांजराची
मनी चोरट्याच्या का रे भीती चांदण्याची?
सरावल्या हातांनाही कंप का सुटावा

उजेडात होते पुण्य अंधारात पाप
ज्याचे त्याचे हाती आहे कर्तव्याचे माप
दुष्ट दुर्जनांची कैसी घडे लोकसेवा

स्वार्थ जणू भिंतीवरचा आरसा बिलोरी
आपुलीच प्रतिमा होते आपुलीच वैरी
घडोघडी अपराध्यांचा तोल सावरावा

तुझ्या हाती पांडुरंगा तिजोरी फुटावी
मुक्तपणे भक्ती माझी, तुझी तू लुटावी
मार्ग तुझ्या राऊळाचा मला आकळावा

भलेपणासाठी कोणी बुरेपणा केला
बंधनात असुनी वेडा जगी मुक्त झाला
आपुल्याच सौख्यालागी करील तो हेवा

Scroll to Top